अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Wednesday 25 November 2009

माझी कविता-१

माझी कविता-

तहानलेली जमीन आसूसले किनारे
उजाड़ झाले पहाड़ घोंघावतात वारे
पहाडमाथ्यास एक निष्पर्ण वृक्ष आहे
उदासवाणा नभाकडे तो खिळून पाहे

म्हणे ढगांना अता तरी रे भरून या ना!
सबंध पृथ्वी सचेतना ही पुन्हा करा ना
तहान माझी तुझ्या जळाची अता मिटू दे
पुन्हा नव्याने नवी उभारी मला मिळू दे!

नभाकडेला अरूण अस्तास जात होता
अशीच वार्ता सुसाट वाराही देत होता
कुठूनसे अन् क्षणात आले नभात सारे
भयाण काळे प्रचंड हे मेघ गर्जणारे

दहा दिशांना कभिन्न काळोख दाटलेला
तरी प्रकाशात वृक्ष तो न्हाउनी निघाला
तयास वाटे तपोव्रते सर्व सार्थ झाली
म्हणून ही मेघदेवता या नभात आली

झपाटलेली सुसाट वर्षा अधीरतेने
तयास भेटावयास आली पहा त्वरेने
अशीच वेगात येतसे ही विशुद्ध वर्षा
तसा तरूही अजून आतुर तिच्याच स्पर्शा

विशाल शाखा नभात उंचावुनी तरू तो
कवेत घेण्या अता तिला तो अधीर होतो
परन्तु होते भयाणशी गर्जना नभी या
अफाट वेगात येतसे वीज तेजकाया

विराट ऊर्जास्वरूप ही चंचला नभीची
थरारती अप्सराच पिंजारल्या जटांची
चिडून पाहे कशी तरूला मिळेल वर्षा
म्हणे मनाशी भिडेन तत्पूर्व मीच वृक्षा

कुशाग्र तीरासमान विद्युल्लता निघाली
क्षणात झाला प्रचंड विस्फोट शक्तिशाली
तरूस भेदून वीज आता मिळे धरेला
जळून गेला तरू उरे फक्त हा निखारा!

No comments:

© Rutwik Phatak
all rights reserved