अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Sunday 15 September 2013

असित

My first poem to have been converted into a song..

https://soundcloud.com/gunjaravstudio/asit

विणकर क्षितिजाचा गुंफतो सूर काही
निमिषभर दिशांना गंध येणार नाही
क्षणिकपण दिनांचे दाटते पापण्यांत
लवलव विझताना हालते मंद ज्योत

कण कण तुटणारा प्राण निर्वस्त्र होतो
धुरकट स्मरणाचे रंग हातात घेतो
मिसळत जगण्याचा एक आक्रोश काळा
क्षण क्षण गळतो अन नग्न आयुष्यमाळा!

अनुभव तिमिराचे सर्व ओलांडणारा
विखरत नभ होतो क्षुब्ध संपृक्त तारा
अविरत पळणारा काळही स्तब्ध होतो
अनभिजित क्षणांचा रंग ब्रह्मांड होतो..

Wednesday 6 February 2013

TED is such a wonderful initiative! I think this is one of the best ways of liberating knowledge! This is one of the best TED talks I have seen... Do watch it!


   

Monday 10 September 2012

शहारा


मोकळे आकाश झाकोळून गेले 
अन् दिशांना काजळाचे पूर आले 
तू अशी बेभान, संध्याकाळ वेडी 
दाटले माझ्या मनी काहूर ओले!

आज रात्री चंद्रही येणार नाही 
चांदण्याने चिंब मी भिजणार नाही 
बोचरा अंगावरी झेलून वारा 
कोरडे हे वृक्ष भांबावून गेले!

दूर काही डोंगरांचे नग्न माथे
आंधळ्या आगीत झाली भस्म शेते..
पाहते धास्तावुनी अग्नी दिलेला-
या धरेने काय ऐसे पाप केले!

बोलका अश्रू तुझ्या गालावरी हा
हुंदक्याचे गूढ सारे सांगणारा 
काळजाचा अन् इथे चुकवून ठोका 
खोल काही सूरही सांगून गेले!

Sunday 12 August 2012

तू


मी खूप प्रयत्न करतो, मनापासून!
तुला विसरण्याचा... 
माझ्या श्वासातून तुझी हाक 
अलगदपणे दूर करण्याचा....


पण पहाटेच्या कळ्या
जेव्हा निरागसपणे उमलतात 
तेव्हा तू दिसतेस..
पहिला श्वास घेणा-या पालवीच्या 
हिरव्या सौंदर्यात तूच असतेस!


मी खूप प्रयत्न करतो, मनापासून!
तुला विसरण्याचा...
आणि मग सगळा दिवस जातो 
तुझं अस्तित्व नाकारण्यात....


पण संध्याकाळी 
धुंद वारा जेव्हा 
अंगांग शहारून टाकतो आकाशाचं,
तेव्हा तू जाणवतेस!


तरीसुद्धा रात्री पुन्हा 
तुला विसरण्याचा-
अंधारात बुडून जाण्याचा 
मी प्रयत्न करतो,


तर तू अलगद चांदणे होऊन 
खिडकीतून पाझरतेस
आणि थेट माझ्या उशाशी येतेस!

आता मात्र मी हतबल आहे.

Friday 11 May 2012

उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम


कुणी रिकामा उगाच उठतो 
चौकामध्ये उभा अचानक,
सामान्यांच्या प्रश्नांसाठी अडून बसतो.
खुळाच! त्याला ठाउक नाही,
ज्यांच्यासाठी प्राण पणाला लावुन लढतो-
शिवून त्यांचे पिंड
उडाला दूर कावळा!


आजकालचे पत्रकारही,
उगाच करती नसत्या थापा 
दुष्काळाच्या नुसत्या गप्पा!
म्हणे उन्हाने लोकांच्या तोंडीचे पाणी 
पळवुन नेले..
तर मग सांगा, आकाशाला नजर लावुनी
बसलेल्या त्या आईच्या 
डोळ्यांतिल पाणी कुठून आले!


विदर्भातला शेतकरीही- 
कशास मरतो तो निष्कारण!
कर्जामध्ये बुडूनसुद्धा उगवत नाही कापुस म्हणतो,
घरास अपुल्या बांधुन घेतो दैवाच्या फासाचे तोरण!

सगळे खोटे!
उगवत नाही कापुस तर मग,
या सा-यांच्या चिंतांचे, 
(सरणावरती बसल्यागत),
चटके न लागता 
कशी राहते उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम?

Saturday 21 April 2012

मी


मी अभंग...
मी अनंत.
मी समृद्ध..
मी संपृक्त! 

निसर्गही माझ्याकडून घेतो
नाना ऋतूंच्या 
असंख्य अवस्थांची कल्पनाचित्रे...
झाडांचे आकार, फुलांचे प्रकार, हवेचे विकार 
सगळ्यांचा उगम मी! 

मी कळ्यांचा मोगराही, 
मीच तो वट-वृक्षही...
मीच संध्यामग्न सिंधू  
मीच मृग-नक्षत्रही...

मी जगाच्या 'अस्मि'तेचा केंद्रबिंदू...
मी दिशा मर्यादणारा...
शून्य,
अस्ताव्यस्त मी,
पार्थीव मी, अव्यक्त मी!

मी काळ, मिती आणि अक्राळ-विक्राळ पसरलेल्या 
ब्रह्मांडाच्या अनाकलनीयतेची 
ब्रह्मगाठ! 

Friday 11 November 2011


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि आपल्यालाच आपला 
आरंभबिंदू दिसत नसतो...
जाणवत असतात फक्त
इतरांच्या असंबद्ध हालचाली..
आणि कुठेतरी खोलवर 
ऐकू येत असतात, 
दूरवरून, 
काळाच्या टापांचे आवाज.....


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि तरीही शेवटी 
सारेच पोचतात तिथे
जिथे दिशांचं काळाशी मीलन होतं...
मृत्यूपाशी!

© Rutwik Phatak
all rights reserved