अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Sunday 29 November 2009

कुसुमाग्रजांची कविता- पाउलचिन्हे

मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
'परमेश्वर नाही' घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी,
का चरण केधवा तुम्हांस त्याचे दिसले?

स्मित करुन म्हणाल्या मला चांदण्या काही
तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाउल-चिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!

Friday 27 November 2009

एक प्रेमकविता...

हळूच यावी रातराणिचा सुगंध घेउनि झुळूक तैशी
गडे अचानक तूही येशी भुलवुनि मजला निघून जाशी!

स्पर्श तुझा हा रेशिमसा श्वासातच हुरहुर भरून जाई
ओंजळीतला जणू मोगरा अंग सुगंधित करून जाई
अशीच जादू तुझ्या प्रीतिची त्यात मला मंतरुनी जाशी
गडे अचानक तूही येशी भुलवुनि मजला निघून जाशी!

कधी जळाचा असशी गाभा कधी नभाची गाठुन उंची
मनास माझ्या मोहित करते छटा तुझ्या या अथांगतेची
कधी तुझी निर्मलता माझ्या नसानसांतुन भरुनी जाशी
गडे अचानक तूही येशी भुलवुनि मजला निघून जाशी!

असे तुझे हे रूप कलंदर मग माझ्या शब्दांतुन स्रवते
आणिक माझ्या नकळत त्याची एक विलक्षण कविता होते
ब्रह्मरूप हे तुझे कवीच्या हृदयामधुनी उजळत जाशी
गडे अचानक तूही येशी भुलवुनि मजला निघून जाशी!

हळूच यावी रातराणिचा सुगंध घेउनि झुळूक तैशी
गडे अचानक तूही येशी भुलवुनि मजला निघून जाशी!


माझी कविता ६

मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते
तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन् माझे केव्हाच मिसळले होते!

मी अंगावरच्या ज़खमा कुरवाळित बसलो होतो
तेव्हाच ज़ख्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते!

तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्याला
अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

माझी कविता ५

काही असं घडून जातं...
मागे उरतो फक्त
एक भावशून्य सुस्कारा

विकृतीच्या निर्विकार भावनेला
हळूहळू मिळतो आकार-
एका भयाण काळ्या सापासारखा-
जो उघड्या डोळ्यांना दिसत नाही
पण कधीतरी अचानक
सुरवण्टाच्या कोशामधून पाखराऐवजी
बाहेर पडावीत बिभत्स गिधाडे
तस तो फणा काढतो
आणि डोक्यावरती या जगाचा
भार पेलणा-या शेषानेच जणु
गिळंकृत करावे या पृथ्वीला
तसा तो माणसांची काळजं
गिळून टाकतो- त्याच निर्विकारपणाने
तेव्हा कृष्णही त्या कालियाचं
मर्दन करू शकत नाही....

काही असं घडून जातं...
मागे उरतो फक्त
एक भावशून्य सुस्कारा

माझी कविता-४

पहाटे पहाटे सूर्य उगवला|
आणि दूधवाला| दारापाशी|

बेल वाजवोनी "किती देऊ बोला"
म्हणे तो आईला| उठवोनी|

ऐसा सुरू होई आईचा दिवस|
बदलोनी कूस| झोपतो मी|

"उठा उठा आता वाजलेत सात!"
आईला संगत| रेडीयोची|

"सव्वासातच्याही बातम्या संपल्या|
कहर जाहला| गधड्यान्नो!"

मग बाबांचीही आईलाच साथ|
पेकाटात लाथ| बसतसे|

चुटकीसरशी उठे अंथरूण|
थोबाडे धुवून| सज्ज आम्ही|

उकळता चहा पेपर पुढ्यात|
त्याची काही बात| और असे|

पेपराचे मग जाहीर वाचन|
शिव्याही घालून| चालतसे|

साडे-आठ झाले-घड्याळ दाखवे|
दादाला आठवे- तेव्हा मग|-

पावणे-नवाला प्रॅक्टिकल आहे|
बाळ धन्य आहे- आज्जी म्हणे|

उठतो उशीरा आवरे निवान्त|
कसे या जगात| चालणार|

एकापाठोपाठ जातसे दुसरा|
मागून पसारा| टाकोनीया|

कसा मी आवरू सगळा पसारा|
आईचाही पारा| चढतसे|



सारे गेल्यावर घर होई रिते|
आज्जीला म्हणते| तेव्हा आई|



घरातली सारी कामे उरकून|
सुस्कारा टाकून| बसे आई|

रिमोट हातात म्हणते मनात|
टीव्ही लावूयात| आई जेव्हा|-

तेव्हा जाते वीज दाबता बटन|
भार-नियमन| सुरू होई|



होते संध्याकाळ- देवापाशी दिवा|
धूपही लावावा- आईनेच|

मग येतो आम्ही दमून भागून|
आमच्या मागून| बाबा येती|

टीव्ही होतो सुरू सोबतीला खाणे|
उशीरा जेवणे| आटोपती|

नन्तर झोपतो आम्ही सारेजण|
आई विरजण लावतसे|

सारे झोपलेले जागी एक आई|
तिच्या कामांनाही| अंत नसे|

साऱ्या घरासाठीच आई जागते|
ज्योतही तेवते| देव्हा-यात|

माझी कविता ३

युक्ती

असाच एकदा ब्रह्मा प्रकटला|
विचारिले मला| तयाने की-

तुझा आवडता देव कोण सांग|
म्हणालो मी मग| वासुदेव|

ब्रह्मा-
{म्हणे ब्रह्मदेव चिडोनिया मला|
जगन्निर्मितीला| भाव नाही|}

तेहत्तीस कोटी देवांमध्ये मुला|
कृष्ण एक तुला| का आवडे?

करी कंस-पूतनेचा तो संहार|
ऐसा शूर-वीर| म्हणोनी का?

गोवर्धन करंगळीने उचले|
जगा वाचवीले| म्हणोनी का?

जगा तत्त्वज्ञान त्याने सांगितले|
गीतेतूनी भले| म्हणोनी का?

मी-
गीता-तत्त्वज्ञान महान वगैरे|
पराक्रम सारे| फिके जेथे|

अशी एक युक्ती सुचली तयाला|
म्हणोनीच मला| आवडे तो|

केल्या सोळा-सहस्र बाया तयाने|
तरी न भांडणे| होती त्यांची|

अशी एक युक्ती सुचली तयाला|
म्हणोनीच मला| आवडे तो|

सत्यभामेकडे लावी पारिजात|
फुले अंगणात| रुक्मिणीच्या|

माझी कविता २

माझं आणि या जगाचं काही पटायचं नाही.....

आजूबाजूला असतील माझ्या
अनेक गोष्टी.....याच जगाच्या
नुसत्याच असतील.......
त्यांच्यामुळे माझं मन काही नटायचं नाही.......
माझं आणि या जगाचं काही पटायचं नाही.....

हे जग मला काय देतंय?
देण्यासारखं जगाकडे काहीच नाही.......
परतफेड?.....उपकार करीन या जगावर!
नुसतेच उपकार.....
याच्यासाठी माझं मन काही झटायचं नाही......
माझं आणि या जगाचं काही पटायचं नाही.....

या जगात बघण्यासारखं आहे काही?
डोळे खिळतील......मन काही रमायचं नाही......
गोलाकार!....मर्यादांच्या जगामध्ये
माझं मन काही उत्साहानं अटायचं नाही.....
माझं आणि या जगाचं काही पटायचं नाही.....

खरं तर हे जग काही खरं नाही......
माझ्यासारख्या माझ्यांभोवती ह्याचाच एक रंग ओततं...
आणि म्हणतं 'ह्याहून वेगळं कोणी असायचं नाही'...
कळत नाही याला.....तो 'मी' आहे...
याच्या रंगात माझं 'मी'पण बरबटायचं नाही......

माझं आणि या जगाचं काही पटायचं नाही.....

Wednesday 25 November 2009

माझी कविता-१

माझी कविता-

तहानलेली जमीन आसूसले किनारे
उजाड़ झाले पहाड़ घोंघावतात वारे
पहाडमाथ्यास एक निष्पर्ण वृक्ष आहे
उदासवाणा नभाकडे तो खिळून पाहे

म्हणे ढगांना अता तरी रे भरून या ना!
सबंध पृथ्वी सचेतना ही पुन्हा करा ना
तहान माझी तुझ्या जळाची अता मिटू दे
पुन्हा नव्याने नवी उभारी मला मिळू दे!

नभाकडेला अरूण अस्तास जात होता
अशीच वार्ता सुसाट वाराही देत होता
कुठूनसे अन् क्षणात आले नभात सारे
भयाण काळे प्रचंड हे मेघ गर्जणारे

दहा दिशांना कभिन्न काळोख दाटलेला
तरी प्रकाशात वृक्ष तो न्हाउनी निघाला
तयास वाटे तपोव्रते सर्व सार्थ झाली
म्हणून ही मेघदेवता या नभात आली

झपाटलेली सुसाट वर्षा अधीरतेने
तयास भेटावयास आली पहा त्वरेने
अशीच वेगात येतसे ही विशुद्ध वर्षा
तसा तरूही अजून आतुर तिच्याच स्पर्शा

विशाल शाखा नभात उंचावुनी तरू तो
कवेत घेण्या अता तिला तो अधीर होतो
परन्तु होते भयाणशी गर्जना नभी या
अफाट वेगात येतसे वीज तेजकाया

विराट ऊर्जास्वरूप ही चंचला नभीची
थरारती अप्सराच पिंजारल्या जटांची
चिडून पाहे कशी तरूला मिळेल वर्षा
म्हणे मनाशी भिडेन तत्पूर्व मीच वृक्षा

कुशाग्र तीरासमान विद्युल्लता निघाली
क्षणात झाला प्रचंड विस्फोट शक्तिशाली
तरूस भेदून वीज आता मिळे धरेला
जळून गेला तरू उरे फक्त हा निखारा!

Sunday 22 November 2009

वाचकहो! नमस्कार!

हा माझा ब्लॉग कशासाठी?
हा काय प्रश्न झाला!कोणीतरी ब्लॉग कशासाठी सुरु करतं?
अर्थातच आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी...आपली मतं मांडण्यासाठी.....आणि चार लोकांनी आपले विचार ऐकावेत यासाठी.
या माझ्या ब्लॉगवर असणारेत अर्थातच माझ्या कविता..काही सुट्या ओळी...काही लेख...झालंच तर काही गोष्टी वगैरे वगैरे!
आणि मला भावलेलं, पटलेलं, आवडलेलं इतर साहित्य.
© Rutwik Phatak
all rights reserved