अर्थाचा जहरी तीर-
असा गंभीर शब्द कवितेचा;
प्रतिभेचा नाजुक स्पर्श,
कोवळा हर्ष शब्द कवितेचा!

Sunday, 15 September 2013

असित

My first poem to have been converted into a song..

https://soundcloud.com/gunjaravstudio/asit

विणकर क्षितिजाचा गुंफतो सूर काही
निमिषभर दिशांना गंध येणार नाही
क्षणिकपण दिनांचे दाटते पापण्यांत
लवलव विझताना हालते मंद ज्योत

कण कण तुटणारा प्राण निर्वस्त्र होतो
धुरकट स्मरणाचे रंग हातात घेतो
मिसळत जगण्याचा एक आक्रोश काळा
क्षण क्षण गळतो अन नग्न आयुष्यमाळा!

अनुभव तिमिराचे सर्व ओलांडणारा
विखरत नभ होतो क्षुब्ध संपृक्त तारा
अविरत पळणारा काळही स्तब्ध होतो
अनभिजित क्षणांचा रंग ब्रह्मांड होतो..

Wednesday, 6 February 2013

TED is such a wonderful initiative! I think this is one of the best ways of liberating knowledge! This is one of the best TED talks I have seen... Do watch it!


   

Monday, 10 September 2012

शहारा


मोकळे आकाश झाकोळून गेले 
अन् दिशांना काजळाचे पूर आले 
तू अशी बेभान, संध्याकाळ वेडी 
दाटले माझ्या मनी काहूर ओले!

आज रात्री चंद्रही येणार नाही 
चांदण्याने चिंब मी भिजणार नाही 
बोचरा अंगावरी झेलून वारा 
कोरडे हे वृक्ष भांबावून गेले!

दूर काही डोंगरांचे नग्न माथे
आंधळ्या आगीत झाली भस्म शेते..
पाहते धास्तावुनी अग्नी दिलेला-
या धरेने काय ऐसे पाप केले!

बोलका अश्रू तुझ्या गालावरी हा
हुंदक्याचे गूढ सारे सांगणारा 
काळजाचा अन् इथे चुकवून ठोका 
खोल काही सूरही सांगून गेले!

Sunday, 12 August 2012

तू


मी खूप प्रयत्न करतो, मनापासून!
तुला विसरण्याचा... 
माझ्या श्वासातून तुझी हाक 
अलगदपणे दूर करण्याचा....


पण पहाटेच्या कळ्या
जेव्हा निरागसपणे उमलतात 
तेव्हा तू दिसतेस..
पहिला श्वास घेणा-या पालवीच्या 
हिरव्या सौंदर्यात तूच असतेस!


मी खूप प्रयत्न करतो, मनापासून!
तुला विसरण्याचा...
आणि मग सगळा दिवस जातो 
तुझं अस्तित्व नाकारण्यात....


पण संध्याकाळी 
धुंद वारा जेव्हा 
अंगांग शहारून टाकतो आकाशाचं,
तेव्हा तू जाणवतेस!


तरीसुद्धा रात्री पुन्हा 
तुला विसरण्याचा-
अंधारात बुडून जाण्याचा 
मी प्रयत्न करतो,


तर तू अलगद चांदणे होऊन 
खिडकीतून पाझरतेस
आणि थेट माझ्या उशाशी येतेस!

आता मात्र मी हतबल आहे.

Friday, 11 May 2012

उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम


कुणी रिकामा उगाच उठतो 
चौकामध्ये उभा अचानक,
सामान्यांच्या प्रश्नांसाठी अडून बसतो.
खुळाच! त्याला ठाउक नाही,
ज्यांच्यासाठी प्राण पणाला लावुन लढतो-
शिवून त्यांचे पिंड
उडाला दूर कावळा!


आजकालचे पत्रकारही,
उगाच करती नसत्या थापा 
दुष्काळाच्या नुसत्या गप्पा!
म्हणे उन्हाने लोकांच्या तोंडीचे पाणी 
पळवुन नेले..
तर मग सांगा, आकाशाला नजर लावुनी
बसलेल्या त्या आईच्या 
डोळ्यांतिल पाणी कुठून आले!


विदर्भातला शेतकरीही- 
कशास मरतो तो निष्कारण!
कर्जामध्ये बुडूनसुद्धा उगवत नाही कापुस म्हणतो,
घरास अपुल्या बांधुन घेतो दैवाच्या फासाचे तोरण!

सगळे खोटे!
उगवत नाही कापुस तर मग,
या सा-यांच्या चिंतांचे, 
(सरणावरती बसल्यागत),
चटके न लागता 
कशी राहते उशी आमच्या बुडाखालती मऊ मुलायम?

Saturday, 21 April 2012

मी


मी अभंग...
मी अनंत.
मी समृद्ध..
मी संपृक्त! 

निसर्गही माझ्याकडून घेतो
नाना ऋतूंच्या 
असंख्य अवस्थांची कल्पनाचित्रे...
झाडांचे आकार, फुलांचे प्रकार, हवेचे विकार 
सगळ्यांचा उगम मी! 

मी कळ्यांचा मोगराही, 
मीच तो वट-वृक्षही...
मीच संध्यामग्न सिंधू  
मीच मृग-नक्षत्रही...

मी जगाच्या 'अस्मि'तेचा केंद्रबिंदू...
मी दिशा मर्यादणारा...
शून्य,
अस्ताव्यस्त मी,
पार्थीव मी, अव्यक्त मी!

मी काळ, मिती आणि अक्राळ-विक्राळ पसरलेल्या 
ब्रह्मांडाच्या अनाकलनीयतेची 
ब्रह्मगाठ! 

Friday, 11 November 2011


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि आपल्यालाच आपला 
आरंभबिंदू दिसत नसतो...
जाणवत असतात फक्त
इतरांच्या असंबद्ध हालचाली..
आणि कुठेतरी खोलवर 
ऐकू येत असतात, 
दूरवरून, 
काळाच्या टापांचे आवाज.....


आयुष्य म्हणजे 
आंधळ्यांची अधांतरी 
शर्यत असते!
सगळेजण धावत असतात 
तिन्ही मितींना 
आणि तरीही शेवटी 
सारेच पोचतात तिथे
जिथे दिशांचं काळाशी मीलन होतं...
मृत्यूपाशी!

Monday, 7 November 2011

हॉस्टेलच्या बाल्कनीतून...


अनंत आकाशात 
असंख्य छिद्रांचे अस्ताव्यस्त 
जुनेरे पांघरून 
बिनघोर, गाढ झोपलीय
विलक्षण सुंदर, तेजस्वी निशा...


समोरच्या अफ़ाट, अथांग सागराचा
जीव उचंबळतोय 
तीस दिवसातून एकदा दिसणारा 
तिचा नितांत सुंदर, रेखीव चेहरा पाहण्यासाठी....


चंदेरी कडांचा एक शुभ्र ढग
लपवू बघतोय तिचा तो चेहरा 
आपल्या नितळ, तलम अस्तरामागे...


खवळलेल्या सागराच्या उत्तुंग लाटा
झेप घेताहेत अवकाशात
त्या अभ्रास दूर सारण्यासाठी.....
पण या मनस्वी रत्नाकराचे हात 
पोचत नाहीत कधीच त्या निरागस निशेपाशी!


आपल्या तेजाची, सौंदर्याची 
मुळीच जाणीव नसलेली ती निशा
तशीच गाढ झोपलीय आपलं जुनेरं कवटाळून...


समोरचा अफाट सागर आता 
विषण्णपणे टिपतोय 
तिच्या रूपाची, तेजाची असंख्य छोटी 
प्रतिबिंबे! 

Wednesday, 18 May 2011

कविता

कधी अचानक
काळोखाच्या रानामध्ये मोर दिसावा
अन मग त्याच्या मागुन जाता
पुन्हा अचानक गायब व्हावा...
तशी मला ती दिसली होती.......
त्यानंतर मग
युगायुगांचे नाते अमुचे असल्यागत
मज वाटत होते,
पुन्हा पुन्हा त्या आठवणीने मनात माझ्या
दाटत होते...
अजूनसुद्धा
तसेच होते, भल्या पहाटे
रात्रीच्या गर्भातून जेव्हा
धुंद चांदण्याचे दव होते,
त्यावेळी मी पाहत असतो
कधी मनाला स्पर्शून गेल्या अदभुत, सुंदर...
कवितेची त्या
साखरस्वप्ने

काळं ऊन

धुळीने माखलेल्या चौरस खिडकीबाहेर
सर्वदूर पसरलंय
मावळतीचं काळं ऊन..
सगळीकडे एकसारखं,
अवकाशातल्या अनंत पोकळीप्रमाणे...
आयुष्यातल्या
सुखदु:खांच्या, श्वासानि:श्वासाच्या ओझ्याने काळवंडलेल्या
म्हातारीसारखा
क्षीण होतोय त्याचाही प्राण
तरीसुद्धा अंधाराशी अजूनही चालू आहे
त्याचा सौदा.

सूर्य पुरता क्षितिजाखाली गेलासुद्धा,
आता काही पर्याय नाही....
काळं ऊन भूत होऊन फिरत राहणार
रात्रीसुद्धा आता
आपल्या मनामनांतून!

Tuesday, 9 November 2010

.......प्रसूती.......

सगळीकडे सामसूम
चेह-यावरती गंभीर भाव
खोलीबाहेर उभे सगळे
ईश्वराचे जपत नाव

कसं होईल? काय होईल?
काळजीमध्ये सगळेजण
छातीमधली धाक-धुक
थांबत नाही एक क्षण

सगळे असतात खोळंबलेले
तेव्हा हळूच उघडून दार
एक येतो दाढीवाला
कपाळावर आठ्या चार

काय झाले काय झाले
सगळ्यानी मग विचारता
दाढीवाला सांगतो कसा
प्रसवली मी 'कविता'!

Wednesday, 1 September 2010

दिशांची लावुनी दारे स्वत:मध्येच रुतलेला
असा गंभीर आताशा कवी माझ्यात भिनलेला

विचारांच्या अशा बेभान लाटा आदळाव्या अन
मतीच्या वादळाने सुन्न व्हावा देह हा सारा,
परंतू पावसापाठून ये मृद्गंधही तैसा
जणू ओंकारानादाने मनाचा धुंद गाभारा

कसे चित्तात अन वृत्तीत या अद्वैत साधावे
अनन्ताच्याच ध्यासाचा अनादी यज्ञ हा आहे!
क्षणांच्या आहुतीने चेतना ही तेवते आहे!

Saturday, 10 July 2010

काळाच्या पारंब्या

काही ओळी सुचून जातात. कुठूनतरी उडत उडत अचानक आपल्या हातावर येऊन बसलेल्या फुलपाखरासारख्या.
अशावेळी या ओळींना कवितेच्या साच्यामध्ये बसवायचं नसतं.
त्या मनोहर फुलपाखराकडे नुसतं बघत बसण्यातच खरा आनंद मिळतो!



मी अजूनही त्या वाटेवर घुटमळतो
अन अजूनही त्या आठवणींना स्मरतो
काळाच्या पारंब्यांच्या आडून आता
'तेव्हाचा मी' आताच्या मजला दिसतो!

Tuesday, 27 April 2010

माझी कविता

वासनांना अंत नाही पण मनाला खंत नाही-
बेरडे वैराग्य येण्या कोरडा मी संत नाही..

मी जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही मी..
तोतया पोशाख घेण्याएवढा श्रीमंत नाही!

जे मनाला वाटते, पटते तसे बोलून टाके,
अक्षरे तोलावया मी थोर प्रज्ञावंत नाही!

मुक्तछंदाचा कवी मी शब्द शब्दा जोडणारा,
उमलती आर्या रचाया पात्र, मोरोपंत नाही

ते बघा कवितेकडे या नासिका मुरडून गेले..
का? म्हणे- 'रचनेत या दिसला कुठेच वसंत नाही!'

का इथे हे गीत मरणाचे तुझे गातोस वेड्या!
मी तुझ्या श्राद्धास येण्या जातिचा किरवंत नाही!

Wednesday, 31 March 2010

मृत्यु

कविवर्य विंदा करंदीकर गेल्यावर अनेक दिवस मनात विचार घोळत होते...ते यारूपाने उतरलेत. !

आज त्याच्या पार्थिवावर हार होता
त्याजसाठी मृत्युही सत्कार होता!

जीवना-मरणामधे ना द्वैत राही
अंतरी हा दिव्य साक्षात्कार होता

अंतरात्म्याची जणू लागे समाधी
लागला का थेट हा गंधार होता?

जिंकुनी झाले इथे दाही दिशांना
स्वर्गिचा जिंकायचा दरबार होता

वाहवा नुसतीच केली या जगाने
पेटला तो अन् पुन्हा अंधार होता.

Thursday, 11 March 2010

नवी गझल

अजून मेघांत वीज जेव्हा थरारताहे
तुझ्या स्मृतीने तसाच मीही शहारताहे!

जरी तुझ्यावाचुनी फुले ही मलूल झाली,
तुझ्या स्मृतीने अजूनही मी तरारताहे!

अता तमाचे उगाच कारण नकोस सांगू
पहा पुन्हा हे नभांग सारे उजाडताहे!

असाच जातो जिथे दिसा नेतसे तिथे मी,
अजून दैवावरी तरी मी विसावताहे!

गुमान जो तो जुनाट वाटांवरून गेला
खुळाच तो जो इथे नवी वाट काढताहे!

फिरून आलो तमाम सारी पवित्रधामे
'उगाच गेलो' विचार आता दृढावताहे   !

कुणी म्हणे हा कवी अताशा लिहीत नाही
कुणास सांगू मनातले जे निखारताहे!

Thursday, 11 February 2010

एक नवीन कविता... माझीच.

सांगू नको रे माणसा अपुली घराणी
जाते पुन्हा ती माकडांपाशी कहाणी!

ऐशी न पूर्वी पाहिली मी जात होती
या चंदनाने शेवटी झिजल्या सहाणी!

गर्दीत होतो गाढवांच्या बैसलेला
माणूस होतो पण तरी ठरलो अडाणी!

आता ढगांचा राहिला कोठे भरोसा
या पावसाने आणले डोळ्यांत पाणी!

मी वास्तवाशी झुंजण्या गेलोच नाही
अमुच्याकडे खोट्या कथा, खोटीच गाणी!

या आमच्या गावात नाहित आडवाटा
(सा-याच जाती थेट घेऊनी स्मशानी!)


Monday, 11 January 2010

दशावतारस्तोत्र- माझी पहिली मोठी संस्कृत रचना.

अतीव धन्य एव विष्णुदेव विश्वतारक: |
धरानिवासिनां नृणां विकास-वासदर्शक: ||

दशावतार तस्य दर्शयन्ति प्राणिवर्धनम् |
जले-स्थले वसन्ति ये इदं च जीववर्णनम् ||

जले बभूव जीवनस्य निर्मिति: पुरा तदा |
यदा स विष्णुदेव मत्स्यरूपकं च धारित: ||

विकासभूत जीव आगतो यदा जलाद्बहि: |
स कूर्मरूपधारणेन ख्याति देव श्रीहरि: ||

क्रमेण सस्तनस्तनभृतश्च जीव आगत: |
तदा वराह नाम विष्णुनाsवतार धारित: ||

अनन्तरं नरस्य उद्भव: पशोर्यदाsभवत् |
स पद्मनाभ मध्यप्राणिनं नृसिंह सूचयत् ||

अथैव उन्नतिक्रमे बटुर्नरोsजायत |
स वामनावतारधारणेन देवदर्शित: ||

यदा मनुष्य शस्त्रचालने प्रवीणताङ्गत: |
न किं नरस्य तस्य एव जामदग्न्य रूपक: ||

विकासितम् नरेण ब्रह्म अस्त्र यान-पुष्पकम् |
युगस्य तस्य एव जानकीपतिस्स दैवतम् ||

प्रचण्डयुद्धमत्र हस्तिनापुरे यदाsभवत् |
तदाsष्टमावतार कृष्ण मार्गदर्शकोsभवत् ||

मनुष्य ऐहिकोपभोगत्याग कर्तुमुद्यत: |
तदा यदा स बुद्ध प्राव्रजत् मन: कुटुम्बत: ||

अयम् प्रभोर्दशावतार धारणस्य अन्वय: |
यदल्पबुद्धिना सुभाषितेsनुकारितो मया ||

वयं मुखे दशावतारस्तोत्र रक्षिष्यामहे |
तदर्थमेव नो मतीस्त्वमेव रक्ष श्याम हे!
 

Sunday, 6 December 2009

धुक्यातली एक वाट

धुक्यातली एक वाट

धुक्यातली एक वाट मला खुणावते आहे
शुद्ध स्वच्छंद उद्याचे स्वप्न दाखवते आहे

शुभ्र धुक्याचा पडदा त्याच्या पल्याडचे आता
काही दिसतच नाही, पण वाट देते ग्वाही-
माझ्यासोबत उद्याचे भाग्य उजाड़ते आहे
धुक्यातली एक वाट मला खुणावते आहे

वाटेवर अडथळे कधी पाऊल ठेचाळे
तेव्हा धरोनिया हात कोणी करेल संगत
तुझी पुण्याईच तुला अशी सावरते आहे
धुक्यातली एक वाट मला खुणावते आहे


वाट चालता चालता धुके विरत जाईल
उंच भरारी घेण्याला नवे क्षितिज मिळेल
आणि गरुडाचे बळ तुला लाभणार आहे
धुक्यातली एक वाट मला खुणावते आहे

डायरी

डायरी

या डायरीचं नशीब असं, की
हिचं पहिलं वहिलं पान
मढतंय माझ्या काळ्या शाईने....

जणु एखादी नवतरुणी
आपल्या सर्वांगावर लावतेय
धुनीमधलं भस्म भयंकर...

बहरलेला पारिजातक
अंगावरती ओढून घेतोय
काळोखाचं वस्त्र भयंकर....

आणि ही तर आहे सुरुवात...
सूर्यालाच आता ग्रहण लागतंय...
कायमचं!
© Rutwik Phatak
all rights reserved